वर्धा – ज्या मार्गाने आपण जात आहात तो मार्ग आव्हानात्मक आहे, मात्र तेवढाच सन्मान देणाराही आहे. वैद्यकीय क्षेत्रात ज्ञानार्जन करतानाच नवे शिकण्याची प्रबळ इच्छा कायम ठेवा, असे आवाहन भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या १५व्या दीक्षांत समारोहात विद्यार्थ्यांना केले. समारोहाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे होते.
विद्यापीठ सभागृहात आयोजित दीक्षांत समारोहात वैद्यकीय, दंतविज्ञान, आयुर्वेद, भौतिकोपचार, परिचर्या, औषध निर्माणशास्त्र, परावैद्यकीय शाखा आणि अन्य विद्याशाखेतील एक हजार ७२१ स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून दीक्षा प्राप्त केली.
*यश पारेख १० सुवर्णपदकांसह १५ पुरस्कारांचा मानकरी*
या समारोहात ११५ सुवर्ण पदके, ७ रजत पदके आणि १३ चान्सलर अवॉर्ड व रोख पुरस्कार देण्यात आले. यात वैद्यकीय शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी यश चिराग पारेख हा सर्वाधिक १० सुवर्णपदकांसह एकूण १५ पुरस्कारांचा मानकरी ठरला. तर हर्षिता हिला ५ सुवर्ण पदकांसह बोस शिष्यवृत्ती प्राप्त झाली. स्नातकोत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी डॉ. अनामिका गिरी हिला ७ सुवर्णपदके, डॉ. किरण मस्तूद याला ४ सुवर्णपदके तर डॉ. शिखा कक्कड हिला २ सुवर्णपदके प्राप्त झालीत. दंतविज्ञान शाखेत डॉली गबाडा ही विद्यार्थिनी ६ सुवर्णपदकांची मानकरी ठरली. आयुर्वेद शाखेत रक्षा कनोजे हिला २ सुवर्णपदके, १ रजत पदक व ३ विशेष पुरस्कार प्राप्त झालेत. भौतिकोपचार शाखेतील वैष्णवी ठाकरे या विद्यार्थिनीला १ सुवर्णपदक व १ रजत पदक प्राप्त झाले. याशिवाय, सर्वच विद्याशाखेतील सुवर्ण, रौप्य, चान्सलर अवॉर्ड व अन्य रोख पुरस्कारप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच ५२ पीएचडीप्राप्त आणि ३२ फेलोशिपप्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
*डॉ. कानिटकर व डॉ. मित्तल यांना डीएस्सी सन्मान*
या समारोहात नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर व अबू धाबी येथील क्लीव्हलँड क्लिनिकचे न्यूरोलॉजी सल्लागार तसेच पार्किसन्स आजार व मुव्हमेन्ट डिसऑर्डर विभाग प्रमुख डॉ. शिवम ओम मित्तल यांना अतिथींच्या हस्ते डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. यासोबतच, शिकागो (अमेरिका) येथील थिंक फार्मा तथा आयुर्विद्या हेल्थ केअर इनोव्हेटिव्ह या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. मुकुंद चोरघडे यांनी या समारोहात ऑनलाईन संवाद साधत डॉक्टर ऑफ सायन्स हा सन्मान स्वीकारत असल्याचे सांगितले.
*ना. जाधव यांनी केला आयुर्वेदसेवेचा गौरव*
भारत सरकारचे आयुष मंत्रालय आणि मेघे अभिमत विद्यापीठातील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय व अनुसंधान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने देशातील सिकलसेल ॲनेमिया नियंत्रणासाठी संशोधनपर कार्य सुरू असल्याचे या समारोहात केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांनी सांगितले. पंचगव्य चिकित्सेबाबत म. गां. आयुर्वेद महाविद्यालयाने केलेले कार्य देशात अन्यत्र कुठे झाले नाही, असा उल्लेखही ना. जाधव यांनी यावेळी आवर्जून केला.
या समारोहाला आमदार डॉ. पंकज भोयर, विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, महासंचालक डॉ. राजीव बोरले, राघव समीर मेघे, कार्यकारी संचालक डॉ. अनुप मरार, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. जहीर काझी, डाॅ. अभ्युदय मेघे, डॉ. तृप्ती वाघमारे, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, परीक्षा नियंत्रक डाॅ. सुनीता वाघ, व्यवस्थापन मंडळ सदस्य ब्रजेश लोहिया, रवि मेघे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अनिता वंजारी, डॉ. उत्कर्षा पाचरणे, सुकेशिनी लोटे, डॉ. अलका रावेकर, डॉ. विद्या लोहे, डॉ. जया गवई, डॉ. रघुवीर रघुमहंती, डॉ. दीपक खोब्रागडे, डॉ. पल्लवी डायगव्हाणे, डाॅ. पंकज अनावडे, डॉ. शुभदा गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. नाजली काझी व डॉ. समर्थ शुक्ल यांनी केले. समारोहाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली तर सांगता डॉ. प्रियांका निरांजने यांच्या पसायदान गायनाने व राष्ट्रगीताने करण्यात आली. या समारोपाला पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसह पालकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.