वर्धा – दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारे स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने हिंगणघाट तालुक्यातील शिरूड येथे शासकीय सामुदायिक आरोग्य शिबीर व जनजागर मोहीम उपक्रमांतर्गत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
ग्रामीण भागात उच्च दर्जाची आरोग्यसेवा सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात एकूण १९७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरातील ४२ रुग्णांना आगामी वैद्यकीय सेवेकरिता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अथवा धर्मादाय योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातील. शिबिरात औषधे, रक्ताच्या विविध चाचण्या, ईसीजी आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि निरोगी जीवनशैली निवडीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आरोग्य शिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. प्रारंभी सावंगी रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते राजेश गडरिया, मुरलीधर उमाटे यांनी शिबिराचे महत्त्व समजावून सांगितले. तर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे रुग्णालयीन समन्वयक रितेश गुजरकर यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.
शिबिराच्या यशस्वीतेकरिता धर्मादाय अधिकारी दिनेश लुंगे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक स्मिता हिवरे, डॉ. सोळंकी, डॉ. विखे, शिरूडच्या सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री तेलरांधे, रुग्णसंपर्क अधिकारी एन.पी शिंगणे यांच्यासह सावंगी रुग्णालयातील विविध वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ डाॅक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी व स्थानिक स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

