वर्धा, दि.30 (जिमाका) : अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासुन दुरावत चाललेला आढळून येत आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. यासाठी उच्च् व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथलयांमध्ये दि.1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी दि.1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्त्क परिक्षण व कथन स्पर्धा उपक्रम राबवून वाचन पंधरवाडा राबविण्यात यावा. यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी, ग्रंथांचे सामुहिक वाचन, इत्यादी उपक्रम राबवून कार्यक्रमाच्या छायाचित्रासह अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ई-मेल द्वारे सादर करावा. सदर उपक्रमातून वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तीमत्वाचे भरणपोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होईल. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी सांगितले

