Ø 31 जुलै पर्यंत प्रत्येक बुधवारी असणार शिबिर
Ø विशेष अभय योजना
वर्धा, दि.31 : नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमीनी फ्री होल्ड करण्यासाठी (भोगवटादार वर्ग 1) विशेष अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत दि.31 जुलै 2025 पर्यंत निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमीनी फ्री होल्ड करण्याकरीता महिन्याच्या दर बुधवारला (शासकीय सुट्टीचा दिवस वगळून)सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये नागरिकांनी अर्ज दाखल करुन विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी केले आहे.
नागपूर व अमरावती विभागातील नझुल जमिनींच्या भाडेपट्टयांची नुतणीकरणाविषयी तसेच त्यासंदर्भातील शर्तभंग, वापरात बदल, विनापरवाणगी हस्तांतरण ईत्यादी विषयाबाबत शासन निर्णय दि.23 डिसेंबर 2015 अन्वये सुधारीत धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर निर्णयान्वये नझुल भाडेपट्टयाचे हस्तांतरण, वापरात बदल, शर्तभंग नियमितीकरणसाठी विहित अनर्जित रक्कमेचे दर जास्त असल्याने ते दर कमी करण्याबाबत शासनाकडे विविध घटकांकडून केलेल्या मागणीचा विचार करुन दि.23 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयात सुधारण करुन दि.2 मार्च 2019 रोजी सुधारीत शासन निर्णय अन्वये नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या जमीनी फ्री होल्ड करण्याबाबतचा देखील निर्णय घेण्यात आलेला होता.
सदर योजना दि.31 जुलै 2025 पर्यंतच राबविण्यात येणार असून त्यानंतर दि.23 डिसेंबर 2015 व दि.2 मार्च 2019 च्या शासननिर्णयानुसार कार्यवाही सुरु राहणार आहे, असे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

