कारंजा ( घा.) स्थानिक मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महा.मध्ये २३ ते २८ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांद्वारे ‘शामची आई ‘ कांदबरीतील विविध नाटिका सादर करून साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ जयंती समारोह सप्ताह संपन्न झाला
‘ जगाला प्रेम अर्पावे ‘ असे सांगणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरूजी म्हणजे मराठी मनाला आणि साहित्याला पडलेले गोड स्वप्न. मातृ प्रेमाचे स्तोत्र गाणारा महाशाहीर. मागील वर्षी स्वर्गीय भैय्यासाहेब उर्फ दिलीपराव काळे यांच्या स्मृतिपित्तर्थ ‘वाचते व्हा ‘ या संस्थेच्या उपक्रमात ‘शामची आई ‘ हे पुस्तक विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात वाचल्या गेले व त्यांच्या मनांमनात रूजले.
सोमवार २३ डिसेंबर रोजी साने गुरुजी शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती समारोहाचे उद्घाटन शाळेचे माजी प्राचार्य डी.आर. देशमुख यांच्या हस्ते झाले तर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून संस्थेच्या अध्यक्षा ॲड. शोभाताई काळे तर प्रमुख उपस्थिती शाळेचे माजी प्राचार्य पी.पी. मोहोड व एस. एम. ठाकरे यांची होती.
पहिल्या दिवशी ‘थोर अश्रू ‘ ही नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित १९९९ च्या बॅचचे माजी विद्यार्थी, माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांनी ‘मुकी फुले’ ही नाटिका सादर केली. या दिवशी अध्यक्ष म्हणून शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी विनोद बारापात्रे हे उपस्थित होते. संस्थेच्या नांदपुर शाळेचे मुख्याध्यापक सतीश लोखंडे, रोहणा शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सुपनर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांनी ‘अर्धनारी नटेश्वर’ ही नाटिका सादर केली. या दिवशी अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य सुभाष अंधारे उपस्थित होते. तर संस्थेच्या सालोड येथील शाळेचे मुख्याध्यापक दिनकर नंदनवार व वरुड येथील प्रतीक शुक्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शुक्रवार २७ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांनी ‘अळणी भाजी ‘ही नाटिका सादर केली. या दिवशी अध्यक्ष म्हणून १९९९ मध्ये असलेले शाळेचे माजी प्राचार्य आर. एस. ठाकरे यांच्या अर्धांगिनी श्रीमती सरोज ठाकरे आष्टी ह्या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोविंद तिरमनवार, डॉ. शरद उमाटे, हेमंत ठाकरे हे उपस्थित होते.
शनिवार दिनांक 28 रोजी साने गुरुजी शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती समारोह सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भारत शिक्षण संस्थेचे सचिव संदीप काळे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुमित वानखेडे, जि. प. च्या माजी अध्यक्ष सरिताताई गाखरे, शाळेचे माजी प्राचार्य हेमंत ढोले यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘शामचे पोहणे’ ही नाटिका सादर केली.
संपूर्ण सप्ताहभर शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नाटिकांमध्ये अभिनयासह विविध भूमिका बजाविल्या. यामधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. प्रत्येक दिवशी विविध अतिथी वक्त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम मार्गदर्शन केले.
अशाच प्रकारची २५ वर्षांपूर्वी साने गुरुजी यांची जन्मशताब्दीचे १९९९ मध्ये स्व. आर.एस ठाकरे प्राचार्य असताना त्यांच्या मार्गदर्शनात रवींद्र डोंगरदेव यांनी आयोजन केले होते. याच परिसरात २५ वर्षांनी अशाच प्रकारचे आयोजन करून माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
शाळेचे मुख्याध्यापक विनोद कहारे यांच्या मार्गदर्शनात
उप मुख्याध्यापक रवींद्र डोंगरदेव यांनी साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती समारोह सप्ताहाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला शाळेचे पर्यवेक्षक चंद्रशेखर गिऱ्हाळे, कनिष्ठ महा. विभाग प्रमुख सचिन दिघडे, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

