spot_img

सावंगी रुग्णालयाच्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची नववर्ष भेट *जिल्ह्यात विविध ठिकाणी आयव्हीएफ ओपीडी कार्यान्वित*

वर्धा – सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात कार्यान्वित टेस्ट ट्यूब बेबी सेंटरद्वारे नववर्षानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी वंध्यत्व चिकित्सा व आयव्हीएफ ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
मातृत्व हा स्त्रीचा निसर्गदत्त अधिकार असून अपत्यप्राप्तीपासून वंचित राहणाऱ्या स्त्रियांना आयव्हीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन प्रक्रियेद्वारे मातृत्वाची आशादायी संधी सहजतेने उपलब्ध करून देण्यासाठी सावंगी मेघे रुग्णालयाव्यतिरिक्त ७ केंद्रांवर ही पूर्वतपासणी सुविधा दर आठवड्याला नियमित उपलब्ध राहणार आहे.
या उपक्रमांतर्गत सोमवारी आर्वी येथील राणे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल, मंगळवारी सेलू येथील सावंगी रुग्णालयाचे ग्रामीण आरोग्य शिक्षण केंद्र, बुधवारी हिंगणघाट येथील तुळसकर हाॅस्पिटल, गुरुवारी पुलगाव येथील पार्वती क्लिनिक, शुक्रवारी देवळी येथील माई हाॅस्पिटल तसेच समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालय आणि शनिवारी स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, आर्वी नाका परिसरातील माई हॉस्पिटल येथे सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान ही विशेष तपासणी सुविधा उपलब्ध राहणार आहे. या केंद्रांवरून आयव्हीएफ उपचारांसाठी येणाऱ्या दाम्पत्यांना विशेष सवलत देण्यात येणार असून सोनोग्राफी व सीमेन विश्लेषण प्राथमिक परीक्षण मोफत करण्यात येईल. तसेच, पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर हा हार्मोन्ससंबंधित आजार असलेल्या स्त्रियांना रक्ततपासणी व सोनोग्राफी या सेवा निःशुल्क प्राप्त होणार आहे.
अपत्यसुखाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांनी आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालक व ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. दीप्ती श्रीवास्तव यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या