अमरावती, दि. ५ जानेवारी (प्रतिनिधी) –  मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील सन २०२४ चे विविध पुरस्कार  आज संघटनेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी जाहीर केले. सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरिअम येथे आयोजित सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, विभागस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार गीता तिवारी, जिल्हास्तरीय (शहर) पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ सुरेंद्र चापोरकर आणि जिल्हास्तरीय (ग्रामीण) पत्रकारिता पुरस्कारासाठी मंगेश भुजबळ मानकरी ठरले आहेत.
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ हा अनेक वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहे. या संघामध्ये जिल्हयातून प्रकाशित होणाऱ्या दैनिकांचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी, प्रतिनिधी, पत्रकार, छायाचित्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे जिल्हा प्रतिनिधी सदस्य म्हणून कार्यरत आहे. या संघातर्फे दरवर्षी पत्रकारांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या पत्रकारिता पुरस्काकरिता पाच सदस्यीय निवड समिती तयार करण्यात आली होती. या समितीत विजय ओडे, संजय बनारसे अरुण तिवारी, सुधीर भारती, सुधीर केणे यांचा समावेश होतो. तसेच या समितीचे पदसिध्द सदस्य संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, महासचिव प्रफुल घवळे आहेत.
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सन २०२४ करिता निवड झालेल्या मानकरींचा सविस्तर परिचय:
राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार* :- ३० वर्षपिक्षा अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव असलेले भाऊ तोरसेकर उर्फ गणेश वसंत तोरसेकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. भाऊ तोरसेकर  हे राजकीय विषयांवर लिखाण करणारे आणि ‘प्रतिपक्ष’ या नावाने यूट्यूब चैनलद्वारे आपली राजकीय भूमिका मांडणारे स्वतंत्र पत्रकार आहेत. तोरसेकर हे एक आर्किटेक्चर गॅज्युएट आहेत. भाऊ तोरसेकर यांनी १९६९ मध्ये आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा येथून पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरूवात केली. साप्ताहिक भूपुत्र, ब्लिट्झ (मराठी), सकाळ (मुंबई) मधून पत्रकारिता केली. १९८५ ते १९८९ या काळात शिवसेनेचे मुखपत्र मार्मिक या साप्ताहिकातून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. त्यांनतर विवेक, चित्रलेखा यांसारख्या साप्ताहिकांमध्ये त्यांनी काम केले.
१९९४ ते १९९७ च्या दरम्यान ‘आपला वार्ताहर चे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. भाऊ १९९८ पासून स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत आहे. २०१० मध्ये ‘पुण्यनगरी दैनिकातून उलट तपासणी हे सदर चालवलं. दि. २३ जून २०२१ रोजी भाऊंना  राज्यपाल (महाराष्ट्र) भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला
जीवन गौरव पुरस्कार ‘स्व. दादासाहेच काळमेघ स्मृती जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार’ या नावाने राहील. या पुरस्काराचे पुरस्काराचे पुरस्कर्ते हेमंतराव काळमेघ राहतील, या पुरस्काराचे स्वरूप रोख रूपये ४१,०००/- रोख, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ राहील.
राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार श्रीमंत माने, संपादक- दैनिक लोकमत नागपूर आवृत्ती यांना जाहीर करण्यात येत आहे. त्यांनी पत्रकारितेमध्ये ३० वर्षापेक्षा अधिक काळ घालविला आहे. पत्रकारितेचा आरंभ काळात अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्य, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मराठी, इंग्रजी वृत्तपत्रामध्ये चिखलदरा, अमरावती, अकोला, जळगांव, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी ३३ वर्षे बातमीदार व संपादक पदावर कार्य. आदिवासी, ग्रामीण भागातील ज्वलंत समस्यांवर विविधांगी, मूलगामी व परिणामकारक वृत्तांकन, पत्रकारितेसोबत आदिवासी विकास, कुपोषणाची समस्या, वन व वन्यप्राणी संरक्षण, जलसंधारण, कृषी विकास, शेतकरी आत्महत्या, अनुशेष निर्मूलन, पर्यावरण रक्षण, फलोत्पादन विकास आदी विषयांवर क्षेत्रांमध्ये काम, महाराष्ट्र सरकारच्या जलसंधारण सलागार परिषदेचे तज्ज्ञ सदस्य म्हणून सहा वर्षे काम. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, जळगांव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, अमरावतीच्या जुने विदर्भ महाविद्यालय या स्वायत्त संस्थेचे अभ्यासमंडळ तसेच समित्यांवर काम केले.
राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ‘स्व. जुगलकिशोरजी अग्रवाल स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार’ या नावाने राहील. या पुरस्काराचे पुरस्कर्ते दै. अमरावती मंडल व मातृभूमि राहतील. पुरस्काराचे स्वरूप रोख रु. ३१,००००, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ राहील.
* *विभागस्तरीय पत्रकारिता पुरस्कार* :- गीता तिवारी, विदर्भ इंचार्ज तथा उपसंपादक दैनिक भास्कर यांना जाहीर करण्यात येत आहे. नागपूरमध्ये पत्रकारितेचा ३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव. १९९६ ते २००९ या कालावधीत साप्ताहिक विदर्भ चंडिका मध्ये उपसंपादक म्हणून कार्य. दैनिक भास्कर वृत्तपत्रात २००२ पासून अमरावती येथे ब्यूरो चीफ, यवतमाळ जिल्हा ब्यूरो चीफ व सद्यस्थिती नागपूर येथे विदर्भ इंचार्ज तसेच उपसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. बंगलोर येथील एका प्रकाशन संस्थेमध्ये लेख, कविता सातत्याने प्रकाशित केल्या, अनेक वृत्तपत्रात स्तंभलेखन केले आहे.
विभागस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे पुरस्कर्ते राहुल गडपाले समूह संपादक दै. सकाळ मुंबई राहतील. पुरस्काराचे स्वरूप, रोख रू. २१,०००/-, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ सहील,
*जिल्हास्तरीय (शहर) पत्रकारिता पुरस्कार* :- सुरेंद्र चापोरकर जिल्हा प्रतिनिधी दैनिक सकाळ अमरावती यांना जाहीर करण्यात येत आहे. चापोरकर हे २८ वर्षांपासून पत्रकारितेमध्ये कार्य करीत आहे. श्री शिक्षण संस्थेच्या कला-वाणिज्य शाखेत पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्यार्थ्यांना पत्रकारिता शिक्षण दिले.
जिल्हास्तरीय (शहर) पत्रकारिता पुरस्काराचे पुरस्कर्ते दै. विदर्भ मतदार राहतील. पुरस्काराचे स्वरूप रोख ११,०००/-, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ राहील.
* *जिल्हास्तरीय (ग्रामीण) पत्रकारिता पुरस्कार* : मंगेश भुजबळ, धामणगांव तालुका प्रतिनिधी दैनिक देशोन्नती यांना जाहीर करण्यात येत आहे. गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे. या काळात त्यांनी विविध वृत्तपत्रात कार्य केले. धामणगांव तालुक्यातील विविध प्रश्नावर त्यांनी लिखाण केले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, शोषित समाजाचे प्रश्न हा अभ्यासाचा विषय आहे. सातत्यपूर्ण पत्रकारिता ही त्यांची जमेची बाजू आहे. पत्रकारितेमध्ये धामणगांव मध्ये दै. महासागर, मातृभूमि, वृत्त केसरी, सिटी न्यूज चैनल, दिव्य मराठी मध्ये कार्य केले.
जिल्हास्तरीय (ग्रामीण) पत्रकारिता पुरस्काराचे पुरस्कर्ते दै. जनमाध्यम राहतील. पुरस्काराचे स्वरूप रोख ११,०००/-, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ राहील

