*आष्टी (शहीद) :
आष्टी येथील रहिवासी आणि सारवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रल्हाद उमरकर यांच्या मातोश्री शांताबाई भिमरावजी उमरकर यांचे दिवशी २७ जानेवारी रोजी चालता बोलता निधन झाले.त्यांचे वय ९३ वर्षाचे होते. मात्र शांताबाई उमरकर या स्मृतीने एकदम ठणठणीत होत्या.त्यांना पेपर वाचण्याचा दररोज छंद होता.शतक गाठतील अशी घरच्यांना आणि नातेवाईकांना आशा होती.मात्र सकाळी ब्रश करता करताच त्या खाली पडल्या आणि देवाघरी गेल्या.शांताबाई उमरकर यांनी मुलाजवळ आणि नातवाजवळ माझे देहदान करण्याचे बोलुन दाखवले होते. देहदान करावं ही शांताबाई यांची तीव्र इच्छा होती.
याच अनुषंगाने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २० मार्च २०२३ रोजी मुलगा डॉ.प्रल्हाद उमरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शांताबाई उमरकर यांनी स्वतः सही करून देहदान करण्यासाठी फार्म भरला होता.त्यावेळी शांताबाई सोबतच १५ जणांनी सुध्दा एकाच वेळी देहदानासाठी फॉर्म भरले होते. त्यामुळे २७ जानेवारी रोजी सकाळी शांताबाई यांचा मृत्यू होताच मुलगा डॉ प्रल्हाद उमरखर ,नातु मनोज उमरकर आणि नातसुन प्रतिक्षा उमरकर यांनी देहदान करण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी लगबग सुरू केली. आणि लेहेगाव येथील भाचा डॉ. धनंजय मा. तट्टे यांच्या सहकार्याने
अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेजची रूग्नवाहीका बोलावुन शेकडो आप्तेष्ट आणि नातेवाईकांचे उपस्थितीत अंत्यविधीचे सर्व सोपस्कार आणि देहदानासाठी लागणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडुन शांताबाई उमरकर यांचा देहदान करण्यात आला.
शांताबाई उमरकर यांनी आयुष्यभर नातेवाईक,गरजू, येणारे जाणारे सगळ्यांचीच मदत केली आहे. आणि आत्ता अखेरचा श्वास संपल्यानंतरही त्यांचा देह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या शैक्षणिक सेवेसाठी कामी पडणार आहे. आईचा देहदान करण्याचा संकल्प पूर्ण केल्यामुळे उमरकर परिवाराने समाजात आदर्श निर्माण केला आहे.