spot_img

कृषी यांत्रिकीकरण योजना : शेतीला आधुनिकतेची जोड जिल्ह्यात 494 लाभार्थींना 321 लक्ष रुपयाचे अनुदान वाटप

 

वर्धा, दि. 11 (जिमाका) : शेती कामासाठी मजूरांचा प्रश्न गंभीर आहे. सध्याचे मजुरीचे दर व त्यामुळे शेतीसाठी येणारा खर्च, मजूरांच्या अभावामुळे शेतीची कामे वेळेवर न होणे आणि प्रत्यक्ष शेतीतून मिळणारे उत्पन्न यामुळे शेती व्यवसाय हा खडतर होत आहे. त्यामुळे शासन शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कृषी यंत्रसामग्री, अवजारे खरेदीस प्रोत्साहन देऊन अनुदान उपलब्ध करुन देते. या योजनेतून जिल्ह्यात 494 लाभार्थींना 321.67 लक्ष रुपये अनुदान डीबीटीव्दारे वाटप करण्यात आले आहे.

शेतीकरीता लागणारा निविष्ठांचा खर्च कमी करुन उत्पादनामध्ये वाढ करावयाची झाल्यास पारंपरिक शेतीमध्ये बदल करुन आधुनिक पध्दतीने यांत्रिकीकरणाव्दारे शेती करणे आवश्यक आहे. शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास मशागत, पेरणी व कापणी पश्चात प्रक्रिया यांत्रिकीकरणाव्दारे केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे शक्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सन 2023-24 व 2024-25 मध्ये ट्रॅक्टर, पावर टिलर चलित यंत्र व अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, कम्बाईन हार्वेस्टर व अवजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी आदी अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर दिले आहेत.

कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणक प्रणाली विकसित केली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा. यासाठी सातबारा, आठ-अ, आधारकार्ड छायांकित प्रत, जातीचा दाखला, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व महिला यांना मंजूर कमाल अनुदान मर्यादा प्रतीयंत्र किंमतीच्या 50 टक्के व इतर लाभार्थींसाठी 40 टक्के अनुदान मर्यादा आहे.000000

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या