आर्वी : आर्वी विधानसभेतील व वर्धा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीसाठी समर्पितपणे कार्य करणारे आणि विविध सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, शेती व शेतकरी हितासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे माननीय सुधीरजी दिवे यांना आगामी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
आर्वी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच पक्ष संघटनेत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले विविध मान्यवर व पक्ष संघटनेतील सध्या या विधानसभा क्षेत्रातील सर्व जबाबदार व्यक्ती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गडकरी यांना प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी, सुधीरजी दिवे यांचे कार्य आणि त्यांचे पक्षासाठीचे योगदान अधोरेखित करण्यात आले.
सुधीर दिवे यांचे पक्षासाठी अमूल्य योगदान
सुधीरजी दिवे यांनी २०१२ पासून भारतीय जनता पक्षाच्या वर्धा जिल्ह्यातील संघटनेला भक्कम आधार दिला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील ‘महात्मा साखर कारखाना’, ‘सुचारा फार्म प्रोड्युसर कंपनी’, आणि ‘मदर डेरी’ यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांद्वारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजपशी जोडले गेले.
तसेच, वैद्यकीय क्षेत्रातही दिवे यांनी ‘अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल’च्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळेच, त्यांचा वर्धा जिल्ह्यातील समाजसेवेतील प्रभाव मोठा असून, ते लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात.
भाजपच्या यशामध्ये दिवे यांचा सिंहाचा वाटा
२०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुधीर दिवे यांनी निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रामदास तडस यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. तसेच, 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली २०१९च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आर्वी विधानसभेसाठी मोठे योगदान दिले.
२०२४च्या विधानसभा निवडणुकीत सुधीरजी दिवे यांच्यावर वर्धा जिल्ह्याच्या चारही विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणून जबाबदारी होती. त्यांनी ती अत्यंत परिणामकारकरित्या पार पाडत आर्वी विधानसभेसह वर्ध्यातील चारही जागा भाजपच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या. विशेष आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये माननीय सुमित वानखडे यांचे प्रचंड मेहनत आणि सुधीरजी दिवे यांच्या नियोजनामुळे एक मोठा विजय मिळविता आला हे विसरता येणार नाही म्हणूनच या आर्वी विधानसभा क्षेत्राला सुमितदादा यांच्या सोबतीला या विधान परिषदेत च्या माध्यमातून एक हक्काचा दुसरा आमदार मिळावा अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे
भाजप कार्यकर्त्यांची मागणी – विधान परिषदेसाठी संधी मिळावी
या पार्श्वभूमीवर, पक्षातील कार्यकर्त्यांची आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकच मागणी आहे – सुधीरजी दिवे यांना विधान परिषदेत उमेदवारी द्यावी. यामुळे पक्षसंघटना अधिक बळकट होईल आणि विदर्भातील शेतकरी, गरीब, वंचित घटकांना त्यांचे प्रभावी नेतृत्व लाभेल.
नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला
या निवेदनावर नितीन गडकरी यांनी गांभीर्याने विचार करत, सुधीर दिवे यांचे कार्य आणि त्यांची पक्षनिष्ठा ओळखून नक्कीच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे वर्धा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
विधान परिषदेसाठी सक्षम नेतृत्वाची गरज
सुधीरजी दिवे यांनी पक्षसंघटनेत अनेक वर्षे मेहनत घेतली असून, २०१९मध्येही विधानसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी आपली दावेदारी मागे घेतली. आता आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांना संधी मिळाली, तर ते पक्षासाठी आणि विदर्भातील विकासासाठी नवा अध्याय लिहू शकतात, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. जर सुधीरजी दिवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली, तर विदर्भाच्या विकासासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
वृत्तांकन : अजय भोकरे