‘‘दि. १-९-१९३६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची भेट श्री. जमनालालजी बजाज यांनी गांधी आश्रम सेवाग्राम येथे घडवून आणली. या भेटीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाग्राम या जागी लोकांच्या भेटीसाठी आले. त्यावेळी या विहाराच्या परिसरातील या दगडावर बसून त्यांनी गावकर्यांसोबत चर्चा केली. शिक्षणाचे महत्व समजावून सांगीतले. शिक्षणामुळेच आपली व समाजाची प्रगती होईल तसेच स्वच्छ रहा असे मौल्यवान मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केले.’’
सेवाग्राम आश्रम महात्मा गांधींच्या वास्तव्याने जगाला माहीत झालेले गांव. स्वातंत्र्याआधी, स्वातंत्र्यांच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांचे प्रेरणाकेंद्र. स्वातंत्र्य मिळाले, स्वातंत्र्याची फळे चाखण्याआधीच महात्मा गांधी नावाच्या सूर्याचा अस्त झाला. गांधीच्या हयातीत मोहन करमचंद गांधी जेवढे चर्चेत नव्हते, तेवढी चर्चा त्यांच्या निर्वाणानंतर या देशात सातत्याने सुरु असते. महात्मा गांधींचा खून नसून वध आहे, असे म्हणणारा एक पंथ सातत्याने गांधींचे प्रात:स्मरण करीत असतो तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि विचाराने प्रभावित जनसमुदाय पुणे करारावरून मोहनदास करमचंद गांधी यांना कटघर्यात उभे करून त्यांना सातत्याने प्रश्न विचारत असतो. त्यांचा गांधींना ‘महात्मा’ आणि ‘राष्ट्रपिता’ म्हणण्यावरही जाहीर आक्षेप असतो. पण अलीकडे घडलेल्या अनेक सामाजिक, धार्मिक, विद्वेषांच्या भिंती या ढासळणार की अधिक मजबूत बनणार यावर अनेक विचारवंत सामाजिक संस्था जनजागृती करताना दिसत आहेत. ‘दक्षिणायन’ ही अशीच विचारवंतांची संघटना भारतभर जनजागृतीचे मेळावे घेत आहे.
२०१८ नववर्षात दक्षिणायाननी सेवाग्राम येथून जनजागृती अभियानाला सुरूवात महात्मा गांधींचे पणतू राजमोहन गांधी आणि डॉ. बाबासाहेबांचे आंबेडकरांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत केली. नागपूरात सुद्धा दिक्षाभूमीवरून शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. नागपुरात विविध विचार प्रवाह मराठा सेवासंघ, ओबीसी आणि आंबेडकरवादी एकत्र येऊन शिवाजी महाराजांच्या संयुक्त जयंती महोत्सवातून विचाराचे चिंतन मंथन घडवून आणले. याच चिंतनातून राष्ट्रीय पातळीवर कार्यरत महात्मा गांधींनी स्थापन केेेलेला ‘सर्वोदय समाज’ या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन २३, २४, २५ फेब्रुवारी २०१८ ला सेवाग्राम येथे बापू कुटीच्या सान्निध्यात; आश्रम परिसरात संपन्न झाले. राष्ट्रीय अधिवेशन घेण्यामागचे खरे कारण महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची संयुक्त १५० वी जयंती निमित्ताने विविध विषयावर चिंतन मंथन करणे हे होते. थोर विचारवंत डॉ. एस. एन. सुब्बाराव हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. ज्यांना त्यांचा मित्र परिवार ‘भाईजी’ म्हणून ओळखतो. देश-विदेशात त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. गेली अनेक वर्षेया माणसाचा परिचय मला आहे. एक ‘सद्भावना रेलयात्रा’ काश्मीर ते कन्याकुमारी सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनात निघाली होती. त्या रेलयात्रेतील लोकांची नागपुरात जेवणाची व्यवस्था करण्याचे सौभाग्य मला मिळाले होते. भारतातील विविध राज्यातील विविध भाषी तरुणांची संख्या या रेलयात्रेत मोठ्या प्रमाणात होती. चंबलची घाटी त्या काळात डाकुंच्या कू्ररकृत्याने हादरली होती. चंबळ परिसरातील ग्रामस्थांचे जीवन भयभीत झाले होते. तेव्हा पेहरावाने हापशर्ट आणि हापपँन्ट घालणारा ऊन, वारा; पाऊसाशी दोन हात करणार्या डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्यासमोर चंबळच्या खुंखार डाकुंनी आत्मसमर्पण केेले होते. त्या सद्भावना यात्रेत हे डाकू सहभागी होऊन लोकांना शांतीचा संदेश देत होते. भाईजींशी अशी माझी जवळीक झाली. भेटीत अनेक विषयावर चर्चा होतात. भाईजी आज नव्वद वर्षाचे तरूण आहेत. श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या चळवळीतही ते सध्या योगदान देत आहेत. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. भाईजींशी चर्चा करताना भारत भाषा, जात, धर्म, पंथ, पक्ष, संप्रदायात न अडकता विविधतेत एकता साधू शकतो. जगाच्या पाठीवर विविधता असूनही भारत एकसंघ लोकशाहीराष्ट्र म्हणून जगात विश्वशांतीचा पुरस्कर्ता आहे. भाईजी जेव्हा बोलतात तेव्हा महात्मा फुले, मोहनदास करमचंद गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, संत कबीर, संत नामदेव, भगवान गौतम बुद्ध, गुरुनानक, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर यांचे विचार मानव जोडू शकतात हे ठणकावून सांगतात. ‘हम सबकी भावना, सद्भावना, ‘भिन्न भाषा, भिन्न वेश, भारत हमारा एक देश’ ‘एक दूसरे की नफरत छोडो दिलको जोडो|’ ‘काश्मीर हो या कन्याकुमारी भारत माता एक हमारी’, ‘अनेकता में एकता भारत की विशेषत:’ अशा नार्यांनी भाईजी तरुण मित्रांमध्ये राष्ट्रभक्ती जागवतात.
या नात्यातील प्रत्येक सद्विचारांना, आसाम, मणीपूर, त्रिपुरा, ओरिसा, उत्तर्र.प्रदेश, बिहार या पूर्व भारतातून आलेले सर्वसामान्य कार्यकर्तेतसेच आंध्र, कन्नड, मल्याळम्, तामिळ भाषिकांचे जत्थे सकाळच्या शांती रॅलीमध्ये महात्मा गांधीसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करीत होते. ही शांती रॅली सेवाग्रामच्या हाकेवरील बुद्ध विहाराच्या परिसरात हजारोंच्या संख्येत डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाला मानवंदना करीत होती. गांधी-आंबेडकरांच्या जयजयकाराने सारा परिसर दुमदुमला होता. सेवाग्राम आश्रम मी अनेकदा बघितला. पण या बुद्धविहाराला प्रथमच भेट देत होतो. एका मित्राने उंच भिंतीवर उभे राहून उपस्थित जनसमुदायाला त्या बुद्धविहाराचे महत्त्व सांगताना, एका प्रेरणास्थळाकडे बोट दाखविले, एका लोखंडी कटघर्यात मोठा दगड ठेवलेला आहे. त्या दगडाशेजारी लावलेला ऐतिहासिक नामफलकही आहे. त्या नामफलकावर ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्थळ’ नमुद असून दि. १-९-१९३६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची भेट श्री. जमनालालजी बजाज यांनी गांधी आश्रम सेवाग्राम येथे घडवून आणली. या भेटीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाग्राम या जागी लोकांच्या भेटीसाठी आले. त्यावेळी या विहाराच्या परिसरातील या दगडावर बसून त्यांनी गावकर्यांसोबत चर्चा केली. शिक्षणाचे महत्व समजावून सांगीतले. शिक्षणामुळेच आपली व समाजाची प्रगती होईल तसेच स्वच्छ रहा असे मौल्यवान मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केले.’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ मे १९३६ ला सेवाग्राम आश्रमला महात्मा गांधींशी चर्चेला आले होतेे. दोन-तीन तास या दोन्ही महामानवांची चर्चा बापू कुटीत घडली. सोबत जेवण घेतले. या घटनेची सेवाग्राम आश्रमने दखल घेवून त्याचा ऐतिहासिक फलक आश्रम परिसरात लावल्या जावा.
देशातील विविध राज्यातील तरुणांंचे कॅमेरे त्या ऐतिहासिक परिसराचे चित्रीकरण करीत होते. सेल्फी काढत होते. महामानवांचा पदस्पर्श दगडांनाही प्रेरणास्थळ बनवित असतात, हे मी अनुभवत होतो. सेवाग्राम आश्रमातील सायंकाळच्या प्रार्थना सभेत पहिल्यांदाच मी सहभागी झालो होतो. विविध धर्माच्या प्रार्थनेसोबत गांधीजींच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग त्या प्रार्थनेच्या वेळेस वाचले जातात. विदेशी पाहुणे त्या सर्व प्रार्थनेला आपल्या कॅमेरात बंदिस्त करताना दिसत होते.
ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक, राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा
मो. ९८२३९६६२८२