spot_img

मेघे अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त *बालकुमार गायकांसाठी स्वरवैदर्भी गीतगायन स्पर्धा* दि. १७ रोजी स्वरचाचणी व ३० ला अंतिम फेरी  

वर्धा – दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त सावंगी (मेघे) येथे विदर्भातील बालकुमार गायकांसाठी ‘स्वरवैदर्भी’ हिंदी सिनेगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची स्वरचाचणी फेरी रविवार, दि. १७ ऑगस्ट रोजी आयोजित असून अंतिम फेरीसाठी १२ गायकगायिकांची निवड करण्यात येणार आहे.
स्वरवैदर्भी स्पर्धेचे हे चोविसावे वर्ष असून यावर्षी ६ ते १६ वयोगटातील बालकुमारांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम २२ हजार, द्वितीय ११ हजार, तृतीय ७ हजार रुपये आणि उर्वरित सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रत्येकी २ हजार रुपये रोख पुरस्कार, प्रमाणपत्र आणि स्वरवैदर्भी सन्मानचिन्ह देण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धकाने दि. १६ ऑगस्टपर्यंत प्रवेशपत्र भरावयाचे आहे. प्रवेशपत्रासोबत स्पर्धकाने वयाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे.
निवड फेरी दि. १७ ला सकाळी ९ वाजता सावंगी येथील शरद पवार दंत महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. या फेरीत हिंदी चित्रपट गीताचे धृपद आणि केवळ एक कडवे सादर करावयाचे आहे. स्पर्धकांसाठी संवादिनी, तबला व अन्य वाद्यांची आणि वादकांची व्यवस्था आयोजकांद्वारे करण्यात येईल. स्पर्धेतील सर्वच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्वरचाचणी स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या १२ स्पर्धकांची महाअंतिम स्पर्धा दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवात शनिवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकालीन सत्रात होणार आहे. ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार असून ‘मेरी पसंद’ या पहिल्या फेरीत स्पर्धक आपल्या आवडीचे सिनेगीत गातील. तर, द्वितीय फेरीत स्पर्धकांना मराठी, हिंदी किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेतील लोकगीत सादर करावे लागेल. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क केवळ २०० रुपये असून ही संपूर्ण रक्कम आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण सहायता निधीला देण्यात येते.
स्पर्धेबाबत अधिक माहितीकरिता गायकांनी किंवा त्यांच्या पालकांनी स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर (९७६५०४७६७२), सहसंयोजक अभय जारोंडे (९७६५४०४०४८) अथवा सुनील रहाटे (९९२१२८७४०८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे महासंचालक डॉ. राजीव बोरले यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या