Team Shahid Bhumi Prahar
वर्धा, दि.22 (जिमाका) : जिल्हा कृषी अधीक्षक कृषि अधिकारी डॉ नलिनी भोयर यांच्या मार्गदर्शनात कृषि विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कार्यवाहीत कृषि केंद्रातील पॉस मशिन व प्रत्यक्ष साठा यात तफावत आढळून आल्याने 17 कृषि केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही तपासणीत जिल्हा भरारी पथक प्रमुख कृषि विकास अधिकारी शिवा जाधव, जिल्हा गुणनियंत्रण निरिक्षक प्रमोद पेटकर, तालुका गुणनियंत्रण निरिक्षक महेंद्र डोफे, पंकज लांडे, रमेश वाघमारे, प्रशांत भोयर, जोत्सना घरत, राजश्री चाफले, शुभ्रकांत भगत व गजानन पुसदेकर यांनी सहभाग नोंदविला होता.
तालुका गुणनियंत्रण निरिक्षक आणि जिल्हा भरारी पथकामार्फत तपासणीत आढळून आलेल्या अनियमिततेबाबत परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे सुनावणी घेण्यात येऊन 15 कृषि सेवा केंद्राचे रासायनिक खत व 2 बियाणे विक्री परवाने निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर 11 कृषि सेवा केंद्रांना सक्त ताकिद देण्यात आल्या.
रासायनिक खत परवाने निलंबित करण्यात आलेल्या कृषि केंद्रामध्ये जैन कृषि केंद्र रोहणा, तुळजा कृषि केंद्र वाढोणा, महाकाली ॲग्रो एजन्सी तळेगाव (र), संकेत कृषि केंद्र समुद्रपूर, संत भोजाजी महाराज कृषि केंद्र समुद्रपूर, शंकर कृषि केंद्र समुद्रपूर, गायत्री सिड्स वर्धा, शालिनी कृषि सेवा केंद्र कारंजा, माऊली ॲग्रो एजन्सी तळेगाव ( शा.पंत ) तालुका आष्टी ,विधी ॲग्रो एजन्सी गिरोली, साहिल कृष केंद्र मांडगाव, कृषि सेवा केंद्र अल्लीपूर, आदर्श कृषि सेवा केंद्र वडनेर, साई सुविधा सेवा कृषि केंद्र सावली वाघ, संत भोजाजी महाराज कृषि केंद्र अल्लीपूरचा तर श्री बालाजी ॲग्रो एजन्सी कानगाव व हटवार कृषि केंद्र कानगाव या कृषि सेवा केंद्राचा बियाणे विक्री परवाना केंद्राचा समावेश आहे.
जिल्ह्यात युरियाची टंचाई होऊ नये म्हणुन 2 हजार 300 मेट्रीक टन इतका साठा संरक्षित करुन ठेवण्याचे लक्षांक आहे. त्यानुसार 2 हजार 172.50 मेट्रीक टन युरिया संरक्षित करण्यात आला आणि दोन टप्प्यात संपूर्ण साठा मुक्त करण्यात आला असून तो कृषि सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकरी बंधूनी युरिया खताच्या उपलब्धतेबाबत आश्वस्त व्हावे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर यांनी कळविले आहे.