spot_img

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला जागं करण्याचा निर्धार* : *१५ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये ‘आक्रोश मोर्चा’, खासदार अमर काळे यांचे आवाहन*

वर्धा : महाराष्ट्रात भाजपप्रणीत सरकारला सत्तेवर येऊन जवळपास दहा महिने पूर्ण होत आले आहेत. निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने आपल्या वचननाम्यात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे ठाम आश्वासन दिले होते. मात्र, दहा महिन्यांचा कार्यकाळ उलटूनही सरकारने अद्याप कर्जमाफीसंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कर्जबाजारीपणा, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, सोलर योजनांमधील अडचणी, वन्य प्राण्यांमुळे पिकांचं होणारं नुकसान, आणि विदर्भात सोयाबीन पिकांवर आलेल्या ‘येलो मोझॅक’ रोगामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

यावर कोणतीही ठोस उपाययोजना सरकारने केली नाही. शेतकऱ्यांची नाराजी वाढत असून, सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करत १५ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक येथे ‘आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.

हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, या मोर्चामार्फत राज्य सरकारला जागे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

“भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली वचने पाळलेली नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्याऐवजी सरकार कुंभकर्णी झोपेत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी आता आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते आहे.”

खासदार अमर काळे यांनी राज्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, युवक व कार्यकर्त्यांना मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.”आपला आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचण्यासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ शेतीचा नाही, तर तो जगण्याचा प्रश्न आहे,” असंही ते म्हणाले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या