वर्धा – जैवविविधतेतील पक्षीजगत हा अविभाज्य घटक असून पर्यावरण रक्षणात पक्ष्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परागीकरण तसेच जंगलांच्या नैसर्गिक निर्मितीसाठी पक्षी सृजनाची भूमिका बजावत असतात, असे उद्गार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बहार नेचर फाउंडेशनद्वारे हनुमान टेकडीवरील ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित जिल्हा पक्षीवैभव सूचीच्या लोकार्पण सोहळ्यात काढले.
जिल्हा वन विभाग व वैद्यकीय जनजागृती मंच यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला पिपरीच्या सरपंच वैशाली गौळकर, जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वन परिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, बहारचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे, संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, आधारवड संस्थेचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, बहारचे उपाध्यक्ष दीपक गुढेकर, मार्गदर्शक अतुल शर्मा, श्याम भेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बहार नेचर फाऊंडेशनने वन विभागाच्या सहकार्याने प्रसिद्ध केलेल्या या सुधारित पक्षीसूचीत जिल्ह्यातील पाणवठे, मोठे तलाव, धरणे, माळरान, उद्याने, टेकड्या, झुडपी जंगल, संरक्षित वनक्षेत्र, व्याघ्र प्रकल्प, मानवी वस्ती आदी विविध प्रकारच्या अधिवासात आढळणाऱ्या ३०४ पक्षीप्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात संवाद साधताना लीळाचरित्र आणि संतसाहित्यातील दाखले देत राहुल कर्डिले म्हणाले की विविधरंगी पक्ष्यांमुळे मानवी जीवनात निर्माण झालेला आनंद अवर्णनीय आहे. वनविभागातील कर्मचारी आणि गाईड यांना पक्ष्यांची ओळख व त्यांचे महत्त्व पटवून देण्यात बहार नेचर फाउंडेशनचे सहकार्य लाभत असून पर्यटकांपर्यंत ही अतिरिक्त माहिती पोचविणे सोपे झाले आहे,
असे प्रतिपादन अर्चना नौकरकर यांनी केले. सरपंच वैशाली गौळकर तसेच डॉ. सचिन पावडे यांनी वृक्ष आणि पक्षी यांचा सहसंबंध आपल्या भाषणातून मांडला. सण साजरे करताना पर्यावरणाला आणि सजीवसृष्टीला अकारण बाधा पोचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन संजय इंगळे तिगावकर यांनी केले. तर जंगल हे पृथ्वीचा प्राणवायू असून त्यांचे संरक्षण अत्याधिक महत्त्वाचे असल्याचे प्रा. किशोर वानखडे म्हणाले. डॉ. बाबाजी घेवडे यांनी पक्ष्यांची ओळख, पर्यावरणातील त्यांचे महत्त्व, अधिवास, स्थलांतरण अशी अत्यंत रोचक व विज्ञाननिष्ठ माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून सादर करीत या कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे संचालन दीपक गुढेकर यांनी केले, तर आभार देवर्षी बोबडे यांनी मानले. या आयोजनात सचिव जयंत सबाने, कोषाध्यक्ष राजदीप राठोड, पवन दरणे, डाॅ. आरती प्रांजळे घुसे, संगीता इंगळे, मनेशकुमार सज्जन, याकूब शेख, प्रतीक्षा गेटमे, आर्य भातकुलकर, नम्रता सबाने, शर्वरी मुळे, वेदांत गुढेकर, आकाश जयस्वाल, यांच्यासह वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन परिसरात लावण्यात होते.
पर्यावरणप्रेमी नागरिकांनी निसर्गाच्या सान्निध्यात आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहून दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला. सर्व उपस्थितांना यावेळी जिल्हा पक्षीसूची देण्यात आली.