Ø शौचालयासह लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम
Ø लाभार्थ्यांना मिळणार 56 कोटींचे अनुदान
Ø बांधकामासाठी प्रत्येकी 1 लाख 32 हजार
वर्धा, दि.14 (जिमाका) : इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत, बेघर लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने यावर्षापासून मोदी आवास घरकुल योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात तब्बल 4 हजार 316 घरकुले मंजूर करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना बांधकामासाठी 56 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
आर्थिक अडचणींमुळे अनेक गरीब कुटुंब आपले स्वत:चे पक्के घर बांधू शकत नाही. अशा कुटुंबांना स्वत:चे व हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी शासन विविध घटकांसाठी घरकुलाच्या विविध प्रकारच्या योजना राबविते. इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुलाची योजना नसल्याने त्यांना यासाठी अनुदान उपलब्ध होत नव्हते. यावर्षी राज्य शासनाने या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे आता या घटकातील हजारो गरीब कुटुंबांना हक्काची पक्की घरे उपलब्ध करून दिली जात आहे.
या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागामधील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर शौचालयासह बांधून देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी ईतर योजनेप्रमाणे ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केली जाणार आहे. घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय खर्चाची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यात ग्रामीण भागात शौचालयासह घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना 1 लाख 32 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेच्या लाभासाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने पंचायत समित्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार प्रस्तावाची छाणणी करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने इतर मागास वर्गातील 3 हजार 883 तर विशेष मागास प्रवर्गातील 433 पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमोर मंजुरीसाठी ठेवले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असलेल्या या समितीने दोनही प्रवर्गातील एकून 4 हजार 316 घरकुलांना मंजूरी दिली आहे.
मंजूर केलेल्या घरकुलांमध्ये आर्वी तालुक्यातील इतर मागास प्रवर्गातील 484 व विशेष मागास प्रवर्गाच्या 85 घरांचा समावेश आहे. आष्टी तालुका इमाव 301 व विमाप्र 62 घरे, देवळी तालुका इमाव 326 व विमाप्र 61 घरे, हिंगणघाट तालुका इमाव 643 व विमाप्र 29 घरे, कारंजा तालुका इमाव 523 व विमाप्र 97 घरे, समुद्रपुर तालुका इमाव 498 व विमाप्र 19 घरे, सेलू तालुका इमाव 565 घरे, वर्धा तालुका इतर मागासवर्गाचे 543 तर विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना 80 घरकुले मंजूर झाले आहे. या लाभार्थ्यांना 56 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे, त्या लाभार्थ्यांना मंजूरीबाबत कळवून त्यांच्या घरकुलाचे बांधकाम तातडीने सुरु करण्याच्या सूचना घरकुल मंजूरी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेस दिल्या आहे, असे समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी कळविले आहे.