नि
वर्धा – हिंदनगर येथील निवासी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त युवा तबलावादक आकाश पुरुषोत्तम चांदूरकर (४७) यांचे मंगळवार, दि. २४ रोजी नागपूर महामार्गावरील सेलडोह नजीक झालेल्या अपघातात निधन झाले.
आकाश नागपूरहून वर्धेला येत असताना दुचाकी उसळल्याने सेलडोहजवळ त्यांचा अपघात झाला. नागपूर आकाशवाणी केंद्रामध्ये एका रेकॉर्डिंगकरिता ते दुचाकीने गेले होते. परतीच्या प्रवासात ते सेलडोहनजीक रस्त्यामध्ये पडून दिसले.
सेलडोह येथील नागरिकांनी महामार्गावरील रुग्णवाहिका बोलावून बेशुध्दावस्थेत असलेल्या आकाशला सेलू येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात भरती केले. तेथे प्राथमिक तपासणी करून सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे सांगण्यात आले. पुन्हा दुसरी रुग्णवाहिका बोलावून सावंगी रुग्णालयाकडे त्यांना रवाना करण्यात आले. दरम्यान सावंगी रुग्णालयात उपचारांसाठी पूर्वतयारी करून ठेवण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात पोचण्यापूर्वीच रस्त्यात आकाश चांदूरकर यांचे प्राणोत्क्रमण झाले. सावंगी रुग्णालयातील आकस्मिक विभागात आणताच डाॅक्टरांनी दहा मिनिटांपूर्वीच निधन झाल्याचे जाहीर केले.
आकाश चांदूरकर स्थानिक स्वावलंबी विद्यालयात कार्यरत होते. त्यांच्यापश्चात वृद्ध आई, पत्नी व १३ वर्षीय मुलगा मृण्मय तसेच मोठा शिष्य परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

