spot_img

*पीएम आवास योजनेतील घरकुलच्या दुसऱ्या टप्प्याचा निधी तातडीने उपलब्ध करून द्या* — *आमदार सुमित वानखेडे यांचे कडे भाजपा जिल्हा महामंत्री अशोक विजयकर यांनी केली मागणी

 

आष्टी (शहीद) – प्रधानमंत्री आवास योजना शहरी बी एल सी घटकांतर्गत नगरपंचायत आष्टी येथील दुसऱ्या टप्प्यातील मंजूर ४४९ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामापोटी केंद्र शासनाच्या हिश्याचा दुसऱ्या हप्त्याचा निधी मिळाला नसल्याने घरकुल बांधकाम ३ वर्षापासून रखडले आहे. हा निधी केंद्र शासनाकडून तातडीने मागविण्याबाबतचे निवेदन भाजपचे जिल्हा महामंत्री अशोक विजयकर यांनी नुकतेच २३ जानेवारीला आमदार सुमित वानखेडे यांना दिले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की नगरपंचायत आष्टीला प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मंजूर झाली. सन २०१९ मध्ये पहिला टप्प्यातील २६७ घरकुल बांधकामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्याचे बांधकामाला सुरुवात झाली असताना ४४९ घरकुल लाभार्थींच्या दुसऱ्या टप्प्याला दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ रोजी शासनाची मंजुरी मिळाली. दिनांक १३/ ८/ २०२१ रोजी राज्य शासनाचा पहिला हप्ता रुपये ४४९ लाख प्राप्त झाला. दिनांक २९/ ९/ २०२१ रोजी केंद्र शासनाच्या हिश्याचा पहिल्या हप्त्याचे अनुदान रुपये २६९.४ लाख रुपये नगरपंचायत आष्टीला प्राप्त झाले. या दुसऱ्या टप्प्यातील काही घरकुल लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने पूर्ण ४४९ घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू करण्यास विलंब झाला. केंद्र व राज्य शासनाच्या अटी व नियमानुसार नगर पंचायत आष्टीला प्राप्त निधीपैकी ७० टक्के निधी खर्च न झाल्याने केंद्र शासनाकडून दुसऱ्या हप्त्याची रक्कम थांबविण्यात आली.शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार प्राप्त अनुदानाची रक्कम खर्च व्हावी म्हणून नगरपंचायत आष्टीला यात बरीच कसरत करावी लागली असून सध्यस्थितीत नगरपंचायत आष्टीने राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त अनुदानापैकी ७०% चे वर निधी खर्च केला असल्याने नगरपंचायत आष्टीला केंद्र शासनाच्या दुसऱ्या हप्त्याचे निधीची प्रतीक्षा आहे तो निधी प्राप्त व्हावा म्हणून नगरपंचायत आष्टीने १५ जानेवारीला वित्त नियंत्रक म्हाडा प्राधिकरण मुंबई यांना मागणी पत्र पाठविले असून या पत्राचा संदर्भ घेऊन भाजपा जिल्हा महामंत्री अशोक विजयकर यांनी दिनांक २३ जानेवारी २०२५ ला आर्वी येथे आमदार सुमित वानखेडे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले.

आष्टी शहरातील दुसऱ्या टप्प्यातील ४४९ लाभार्थ्यांचे घरकुल बांधकामाचे अनुदान रखडल्याने शहरातील घरकुल लाभार्थी त्रस्त असल्याचे अशोक विजयकर यांनी आमदार सुमित वानखेडे यांना अवगत केले. आणि हे अनुदान तातडीने म्हाडा प्रधिकरणाकडून उपलब्ध होण्याकरिता प्रयत्न करण्याचे त्यांना साकडे घातले.

आमदार सुमित वानखेडे यांनीही या निवेदनाची लागलीच दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक २५ जानेवारीला लेखी पत्र दिले असून गेल्या ३ वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या आष्टी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ दिलासा देण्याची विनंती आमदार सुमित वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या