spot_img

वर्ध्याच्या दाते स्मृती संस्थेचे साहित्य पुरस्कार जाहीर *सुरेश पाटील, दादा गोरे, अजीम राही, प्रतिभा सराफ, कोळी, डोंगरदिवे मानकरी*

वर्धा – महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठाप्राप्त असलेल्या यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे गत तीन वर्षाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यावर्षी सुरेश पाटील, प्रमोद मुजुमदार, दादा गोरे, अजीम नवाज राही, नामदेव कोळी, प्रतिभा सराफ, किरण डोंगरदिवे यांच्यासह एकूण १८ साहित्यिकांच्या मराठीतील दर्जेदार पुस्तकांना पुरस्कार दिले जातील.

दाते स्मृती संस्थेद्वारे १९९६ पासून सातत्यपूर्वक उत्कृष्ट मराठी साहित्यकृतीना पुरस्कृत केले जाते. मात्र, सन २०२१, २२ व २३ या तीन वर्षात काही अपरिहार्य कारणांमुळे राहिलेले वाङ्मय पुरस्कार यंदा प्रदान करण्यात येणार असून पाच हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

संस्थेद्वारे दिला जाणारा बाबा पद्‌द्मनजी कादंबरी पुरस्कार मागील तीन वर्षात अनुक्रमे प्रकाशित ‘आरसा’कार ईश्वर हलगरे, पुणे, ‘पाऊसकाळ’साठी विजय जाधव, सांगली आणि ‘अंतपार’ या कादंबरीकरिता सुरेश पाटील, मुंबई यांना दिला जाईल. बापूरावजी  देशमुख कथासंग्रह पुरस्कार डॉ. भास्कर बडे, लातूर (बाईचा दगड), डॉ. अशोक कौतिक कोळी, धुळे (कडीबंदी) व डॉ. प्रतिभा जाधव, नाशिक (दहा महिन्याचा संसार)  या कथासंग्रहांना जाहीर झाला आहे. संत भगवान बाबा काव्यसंग्रह पुरस्कारासाठी नामदेव कोळी, मुंबई (काळोखाच्या कविता), अजीम नवाज राही, साखरखेर्डा (तळमळीचा तळ) आणि ललित अधाने, संभाजीनगर (माही गोधडी छप्पन भोकी) यांची निवड करण्यात आली आहे. पद्‌माकर श्रावणे बालसाहित्य पुरस्कार प्रतिभा सराफ, मुंबई (मिठू मिठू), वैजनाथ अनमुलवाड, नांदेड (रंग सारे मिसळू द्या!) आणि सुमन नवलकर,  मुंबई (रोज नवी गोष्ट हवी) यांना दिले जाणार आहेत. उत्कृष्ट अनुवादित पुस्तकासाठी प्रमोद मुजुमदार, पुणे (उम्मने  कुलसुम – कुलसुम पारेख ), पृथ्वीराज तौर व स्वाती  दामोद‌रे, नांदेड यांना संयुक्त (स्त्रीकोश : भारतीय स्त्री कविता) आणि रचना, अहिल्यानगर (यज्ञ आणि इतर कविता – पारमिता षडंगी) यांना देण्यात येईल. अंजनाबाई इंगळे तिगावकर स्त्रीवादी साहित्य पुरस्कार डॉ. दादा गोरे, संभाजीनगर (स्त्रियांचे  समकालीन साहित्य), डॉ. सुनीता सावरकर (ढोर चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ) आणि किरण डोंगरदिवे, मेहकर (काव्य प्रदेशातील स्त्री) यांना दिला जाईल.

सदर वाङ्मय पुरस्कार येत्या मार्च महिन्यात आयोजित वार्षिक व्याख्यानमाला व पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव संजय इंगळे तिगावकर व पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. राजेंद्र मुंढे यांनी जाहीर केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या