आष्टी (शहीद):-
केवळ राज्यातच नव्हे राष्ट्रीय पातळीवर एक क्रांतिकारी गाव म्हणून कीर्ती मिळवणारे श्रीक्षेत्र साहूर आहे.कारण याच गावातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ नामकरणाचा लढा सुरू झाला. त्यासाठी मानव जोडो संघटनेचे प्रणेते रमेशचंद्र सरोदे हे अखेरपर्यंत प्राणपणाने लढले. हा इतिहास कुणीही बदलू शकत नाही. या अविस्मरणीय लढ्याचा एक सत्याग्रही म्हणून मी स्वतः साक्षीदार असल्याचे प्रतिपादन प्रा.श्रीराम ढोबळे यांनी केले.
साहूर येथे आदर्श होळी धुलीवंदन महोत्सवात ते बोलत होते. गेल्या १५ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ नामकरणाचे शिल्पकार रमेशचंद्र सरोदे हे या महोत्सवाचे आयोजन करीत आहे.साहुर येथील लक्ष्मीनारायण मंदिर सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी पंचायत समिती सभापती ईश्वर वरकड तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक गजानन सरोदे नागपूर,ग्रामगीताचार्य प्रा.विनोद पेठे, पत्रकार अमोल सोटे,नागपूर येथील नायब तहसीलदार किशोर शेंडे,रेखा शेंडे,मोहनदास राठी,गुणवंत राऊत, दीपक खरडे,रमेशचंद्र सरोदे मंचावर उपस्थित होते.
दारूच्या व्यसनामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहे.अनेक तरुण मृत्यूच्या दारात उभे आहे.भावी पिढी वाचावी म्हणून अनेक सुधारक मंडळी आता एकत्र येऊन रंगाविना व व्यसनमुक्त होळी धुलीवंदन सोहळा साजरा करण्यासाठी पुढे सरसावले आहे.याप्रसंगी हास्यसम्राट लोकशाहीर नारायणदास पडोळे महाराज यांनी पंचरंगी कीर्तनातून हास्याची उधळण करीत प्रबोधन केले.
यावेळी एकूण ११ सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला.यामध्ये इंजिनिअर माधवी निलेश दंडाळे, प्रा.श्रीराम ढोबळे, माजी प्राचार्य हरिभाऊ वानखडे, विवेक लाड,वसंत ढवळे, माजी सरपंच दामोदर गावंडे व मरणोत्तर स्व.कुसुमताई गावंडे, माजी मुख्या. धनराज तुपकर,नामदेव बाळोकार, रघुनाथ गोंधळे,प्रभाकर भोरे,सिताराम कांदे यांचा समावेश आहे.यावेळी स्व.मयूर भोरे स्मृती प्रित्यर्थ वेशभूषा स्पर्धत ८० विद्यार्थी, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत ६२ विद्यार्थी,गीत गायन स्पर्धा ३७ विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी स्व.मयूर भोरे यांच्यासह मागील एक वर्षात साहूर मध्ये ज्यांचे निधन झाले त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे नियोजन चेतन भोरे,काशिनाथ गोंधळे,हरिभाऊ टाकळकर,अंजली मनोज बोंदरे,आकाश पाटमासे,गजानन करडे यांनी केले.
संचालन गायत्री घोटकर,आभार कल्याणी खिरटकर यांनी मानले. राष्ट्रवंदने कार्यक्रमाची सांगता झाली.