*महात्मा गांधी ग्रामिण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी), वर्धा या संस्थेला जागतिक स्तरावर नेण्याकरीता सादर केलेल्या प्रस्तावाला त्वरीत मान्यता देण्यात यावी.*
– *खासदार अमर काळे यांची केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांचेकडे प्रत्यक्ष भेटून पत्राद्वारे मागणी.*
वर्धा :महात्मा गांधी ग्रामिण औद्योगिकीकरण संस्था भारत सरकारच्या सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या अधिन असून ही एक स्वायत्त संशोधन संस्था आहे. ही संस्था गांधीवादी विचारधारेला अनुसरुन ग्रामिण उद्योग धंदयाचे बळकटीकरण करणे व यातून उत्पादीत वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे काम करते. या संस्थेच्या माध्यमातून चालविलेल्या उपक्रमाला चालना देण्याचे दृष्टीने सन 1955 मध्ये जमनालाल बजाज, केंद्रीय अनुसंधान संस्थान या संस्थेची स्थापना करण्यात आली. आधुनिक युगात खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी व ती टिकविण्याच्या दृष्टीने के.वी.आय.सी. व आय.आय.टी. दिल्ली यांच्या संयुक्त प्रयत्नातून सन 2001 ते 2008 च्या दरम्यान जमनालाल बजाज केंद्रीय अनुसंधान या संस्थेचे महात्मा गांधी ग्रामिण औद्योगिकीकरण संस्थान (एमगिरी) या नावाने पुर्ननिर्मिती करण्यात आली. या संस्थेत सहा विभाग असून खादी व वस्त्रोदयोग, सेंद्रीय शेती, हर्बल आधारीत उदयोग, ग्रामिण रासायनिक उदयोग, ग्रामिण शिल्प व स्थापत्य कला, ग्रामिण बुनियादी ढाचा व ऊर्जा या क्षेत्रात ही संस्था काम करीत आहे. संस्थेने विकसित केलेल्या गोवंशावर आधारित पंचगव्य उत्पादने ही सुक्ष्म, लघु व मध्यम उदयोग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेमध्ये समाविष्ट करुन शेकडो गोशाळेपर्यंत पोचविण्यात आली आहे. यामुळे कित्येक गोशाळा स्वत:च्या पायावर उभ्या असून सृजन रोजगार केंद्राच्या रुपाने पुढे आलेल्या आहेत. या संस्थेद्वारे मातीकला, धातुशिल्प, बांबू व लाकडी शिल्प,रेशिमोद्योग, ताग या क्षेत्रात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ एवढेच नाही तर देशातील मेघालय सारख्या राज्यात तसेच पूर्वेकडील दुरदूरच्या भागात या संस्थेने तेथील कारागिरांमध्ये क्षमता निर्माण करुन त्यांचेकडून कौशल्य विकासाच्या हेतूने काम करणारी एमगिरी ही एकमेव संस्था आहे. एवढेच नाही तर लेह लद्दाख सारख्या ठिकाणी एल.ई.डी. लाईट तसेच सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे तसेच ड्रायर, डिकोर्टीकेटर, सौर उर्जेवर चालणारी यंत्रे निर्माण करुन ग्रामिण उदयोग निर्मितीमध्ये मोठे कार्य केले आहे. एमगिरीमध्ये उत्पादित वस्तूमध्ये वेगवेगळया सुधारणा, परिसराचे परीक्षण, औद्योगिक प्रसार व जागरुकता येण्याचे दृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करणे, तांत्रिक समस्यांची माहिती करुन घेणे, औद्योगिक व कौशल्य विकासाच्या दृष्टीने प्रशिक्षणात्मक कार्यशाळा आयोजित करणे. पेटेंट सादर करणे, चालु असलेल्या उद्योगांना सल्ला देणे, संस्थेमध्ये चालु असलेल्या औद्योगिक घडामोडींवर लक्ष ठेवणे, औद्योगिक संघटन तसेच निमसरकारी संघटना, खाजगी संघटना यांचेशी समन्वय साधणे ही सर्व कामे या संस्थेतील केवळ 17 वैज्ञानिक व 18 तांत्रिक कर्मचारी यांचेकडून केल्या जाते.
या संस्थेत एमगिरीद्वारा आयोजित एम.एस.एम.ई. दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या संस्थेत जाण्याचा योग आला. तसा मी या संस्थेशी बरेच दिवसांपासून परिचित आहे. परंतु खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या संस्थेत कार्यक्रमाच्या निमित्ताने खरा योग 27 जुन 2025 ला आला. या संस्थेत चालत असलेल्या सर्व उपक्रमांची मी स्वत: पाहणी केली व अनेक उपक्रमांबाबत संस्थेचे संचालक डॉ. श्याम मुरकुटे यांचेकडून माहिती घेतली. ही संस्था पुर्णत: ग्रामिण उद्योगांवर आधारित असून या उद्योगाला लागणारा कच्चा माल सुध्दा ग्रामिण भागातूनच उपलब्ध होतो. या उपक्रमातून ग्रामिण क्षेत्राला आर्थिक बळकटी प्राप्त होण्याच्या दृष्टीने या उद्योगाला शासकीय बळ देणे महत्वाचे आहे. या सगळया बाबतीत संचालक, डॉ. श्री. श्याम मुरकुटे यांनी मला पुर्ण माहिती दिली व या संस्थेला जागतिक स्तरावर नेण्याकरीता काय करावे लागेल व त्यात कोणत्या अडचणी येतील, त्यातून काय मार्ग काढावा लागेल याबाबत संपूर्णपणे माहिती दिली. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामिण भागातील लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून या संस्थेत चालणाऱ्या प्रत्येक उपक्रमाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित व्यक्ती स्वत:चे पायावर उभे राहून आपला उद्योग स्वत: चालविण्यास सक्षम बनविण्याचे काम या संस्थेमध्ये केले जाते. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामिण अर्थव्यवस्था निश्चितच बळकट बनु शकते या संस्थेत होणारी उत्पादने ही आरोग्याच्या दृष्टीने सुध्दा तेवढीच लाभदायक होत असून यातून मानवी जीवनाला सध्याच्या धोकादायक रासायनिक उत्पादनांपासून वाचविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या संस्थेतून होणारी उत्पादने वापरणे होय. त्यामुळे या संस्थेला जागतिक स्तरावर मान्यता देण्याच्या दृष्टीने केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उदयोग विभागाद्वारे सादर केलेल्या मागण्यांवर तात्काळ विचार होणे गरजेचे आहे.
या संस्थेकडून प्रामुख्याने 25 नवे संशोधक व 25 तांत्रिक कर्मचारी यांच्या पदाला मान्यता देणे, पंचगव्य उद्योगावर आधारित नविन विभाग निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देणे आवश्यक आहे. ग्रामिण उद्योगीकरणात काम करणारे तसेच खादीचे उत्पादन करणारी एमगिरी ही एकमेव राष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेत होत असलेल्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याकरीता या संस्थेला सेंटर ऑफ एक्सलन्स च्या रुपाने विकसित करण्याकरीता केंद्र सरकारकडून या संस्थेला रु. 500 कोटी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली. या सोबतच या संस्थेला विकसित करण्याकरीता आवश्यक असलेली जमिन उपलब्ध करुन देण्याबाबतही मागणी करण्यात आली.
वरील मागण्यांसोबतच ग्रामिण अर्थव्यवस्थेवर आधारित एमगिरी सारख्या संस्थेची निर्मिती महात्मा गांधी यांनी केली असून या संस्थेत रोजगार निर्मिती करण्याची अपार क्षमता आहे. परंतु या संस्थेला विकसित करणे हेही तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळे या संस्थेला एकदा तरी आपण भेट दयावी अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांचेकडे केली व एमगिरी संस्थेच्या मागण्यांचे पत्र केंद्रीय मंत्र्यांना दिले. मंत्री महोदयांनी सादर केलेल्या मागणीवर निश्चितपणे विचार करण्याचे आश्वासन दिले व ग्रामिण अर्थव्यवस्थेवर आधारित ग्रामिण भागातील लोकांना एवढया मोठया प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता असलेली संस्था आजही टिकून आहे याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी गौरोदगार काढले व संस्थेला भेट देण्याचे मान्य केले.