_मराठा सेवा संघ ही संस्था शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी १९९० साली स्थापन केली. या संस्थेच्या मार्फत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषद, शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषद असे ३३ कक्ष चालविले जातात. या संंस्थेने समाजात प्रबोधन करून १२ जानेवारी रोजी जगातील सतरावा शिवधर्म स्थापन केला. विज्ञानावर आधारित मानवतावादी मुल्यांची जपणूक करणारा हा धर्म आहे. सेवा संघाच्या वतीने सिंदखेड राजा येथे दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. शिवधर्म स्थापनेला १४लाख बहुजन मराठा शिवभक्त उपस्थित होते. आपण माणसातल्या माणुसकी धर्माप्रती बांधिलकी जपणाऱ्या शिवधर्माचे सेवक आहोत. शिवसाधक हा कुठल्याही बंधनात अडकवला जाऊ शकत नाही. मराठा सेवा संघ हा शब्द वाचला की, अनेकांना प्रश्न पडतो, ही नेमकी कोणती संस्था आहे? त्याचे काय काम आहे? त्याच्या माहितीविषयी हा थोडासाच प्रयत्न. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा हा महत्त्वपूर्ण लेख अभ्यासा…. संपादक._
दि.१ सप्टेंबर १९९० रोजी बहुजन समाजांतील सर्व घटकांनी विरोध, द्वेष सोडून एकत्र यावं या उदात्त हेतुने ऍड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास आणि चिंतन करून मराठा सेवा संघाची स्थापना अकोला येथे केली. मराठा सेवा संघ व त्याअंतर्गत ३३ कक्षांच्या माध्यमातून सर्व मराठा समाजाच्या अथक परिश्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरोगामी विचारांचे सशक्त व राष्ट्रनिर्मितीकरिता बलशाली संघटन म्हणून मराठा सेवा संघ सर्वांना सुपरिचित झाला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शेकडो वर्षांपासून पुरुषसंस्कृती असतांनासुद्धा मराठा सेवा संघाने संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा मातृतिर्थ सिंडखेडराजा येथे मांसाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊ सृष्टीचा भव्यदिव्य प्रकल्प हाती घेतला आणि अत्यंत जलद गतीने हा प्रकल्प पूर्णही होत आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा प्रकल्प, खरेच हा मातृसत्तेचा गौरव, सन्मान मराठा सेवा संघच करू शकतो. मातृशक्तीचा प्रत्यक्ष कृतीतून सन्मान करणारं जगातील एकमेव संघटन म्हणजे मराठा सेवा संघ!
सन १९९६पासून मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे घणाघाती वार करणारी तीक्ष्ण तलवार अशी ओळख धारण करणारी संस्था आहे. खरंतर मराठा सेवा संघाने नेमकं कोणतं कार्य केलं? हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना कधीच पडत नाही. परंतु समाजातील धार्मिक आणि जातीय द्वेष पसरविणाऱ्या विघातक प्रवृत्तींनी सर्वसामान्य लोकांपर्यंत मराठा सेवा संघ आणि त्याचे वास्तविक विचार पोहोचू नयेत म्हणून त्याविषयीची बदनामीची मोहीम राबवली, जो अपप्रचार केला,जे चुकीचे चित्र समाजासमोर उभे केले, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना मराठा सेवा संघाचे मुख्य उद्देश आणि भरीव कार्य याविषयी प्रश्न पडणे साहजिक आहे. ही माहिती वाचून थोडी जरी भर पडली तर या लेखप्रपंचामागील हेतू सफल झाला, असे म्हणता येईल.
मराठा सेवा संघाचे कार्ये; महाराष्ट्राच्या सामाजिक भुमीची नव्याने मशागत केली, सर्वांना “जय जिजाऊ, जय शिवराय!”, “एक मराठा, लाख मराठा!”, अशी आपुलकीची घोषवाक्य दिली. राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाला “जय जिजाऊ!” असे अभिवादनमुल्य प्राप्त करून देवून लाखो लोकांना एकत्र आणले; पूर्वी राष्ट्रमाता जिजाऊंचे कोणताच चित्र, फोटो उपलब्ध नव्हते, त्यांचे तैलचित्र बनवून ते अधिकृत करून राज्याच्या मंत्रालयात लावून घेतले. विधानसभेत शिवजयंतीच्या तारखेच्या वादावर चर्चा घडवून १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची अधिकृत तारीख निश्चित करून घेतली आणि वादावर कायमचा पडदा पाडला. १२ जानेवारी हा मांसाहेब जिजाऊंचा राष्ट्रीय जन्मोत्सव दिन जाहीर केला. सन १९९०पूर्वी हा दिवस इतिहासजमा झाला होता. परंतु जिजाऊंच्या जन्मगावी सिंदखेडराजा येथे खेडेकर साहेबांनी जिजाऊ जन्मोत्सवाचा प्रारंभ केला आणि आज खेडोपाडी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून युवक, युवती आबालवृद्ध मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात.
मांसाहेबांवर लेखन केले जात आहे. त्यांच्या चरित्राचे विविध पैलू विचारवंत आपल्या भाषणातून लेखातून उलगडून समाजापुढे ठेवू लागले आहेत. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा उत्साह १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव दिनी अत्युच्च बिंदूवर शिगेला पोहोचत असतो. मराठा समाजाला त्यानिमित्ताने एका नव्या सांस्कृतिक पर्वाचा लाभ झालेला आहे. सिंदखेडराजा या बुलडाण्यातील जिजाऊंच्या जन्मगावी लाखाहून अधिक लोक शेकडो गाड्यांतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून “जय जिजाऊ, जय शिवराय!” असा उद्घोष, ऐतिहासिक स्फूर्तिदायक पोवाड्यांचे गायन हे सारे काही मन उल्हासीत, प्रफुल्लित करणारे असते. १९ फेब्रुवारी- शिवजयंती किल्ले शिवनेरी, १४ मे- शंभुजयंती किल्ले पुरंदर, ६ जून- शिवराज्याभिषेक किल्ले रायगड हे उत्सव सुरू केले. २९ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यासाठी शासननाकडे यशस्वी पाठपुरावा केला. पानिपतच्या युद्धातून वाचलेले रोड मराठा आणि महाराष्ट्रातील मराठा बांधवांचा मराठा मिलन समारोह घडवून आणला. धार्मिक, विद्वेषातून दगडं उचलणाऱ्या युवकांच्या हातात वैचारिक पुस्तकं दिली आणि महाराष्ट्रातील जातीय सलोखा वाढविला. इतिहासाच्या पुनर्लेखनाची चळवळ उभारून इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यावर दहशत बसविली. महापुरुषांचे विचार घराघरापर्यंत घेऊन जाणाऱ्या लेखक, कवी, शाहीर, कलाकारांची मोठी फळी तयार केली. समाजाला आपल्या पूर्वजांच्या शौर्याची जाणीव करून दिली. लेखकांना वाचकवर्ग, वक्त्यांना श्रोतावर्ग, कलाकारांना प्रेक्षकवर्ग आणि अख्ख्या महाराष्ट्राला वैचारिक वर्ग प्राप्त करून दिला. धार्मिक गोष्टींचा विचार करता धर्माचार्य उदात्त विचार सांगणारी शिवधर्म गाथा दिली. आपली नाणी, वाणी, गाणी, लेखणी आणि करणी आपण आपल्याच लोकांविरोधात वापरू नये, ही आचारसंहिता दिली. युवकांना बुटांच्या पाॅलिशपासून डोक्याच्या मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय करण्याची मुभा व दृष्टीही दिली. धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, प्रचार-प्रसारमाध्यमसत्ता, यांचे महत्त्व समाजाला पटवून दिले. अज्ञात, अंधश्रद्धा, अहंकार, आणि न्यूनगंड ही समाजाच्या अधोगतीची कारणे आहेत याची सर्वांना जाणीव करून दिली. समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपवण्यासाठी समाजाला सांस्कृतिक वारसा आणि बुद्ध, तुकोबा, शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर ही साखळी समजावून सांगितली. मराठा सेवा संघाचे कार्य प्रत्यक्षात जितके दिसून येते तितकेच अप्रत्यक्ष महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांवर मराठा सेवा संघाच्या चळवळीचा प्रभाव पडला आहे. जे अनेक युवक वेगवेगळ्या विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होतात, त्यासाठी मराठा सेवा संघाचे खूप मोठा आधार मिळत आला आहे.
!! मराठा सेवा संघ स्थापन दिन चिरायु होवो !!
– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.