अमळनेर :
Hi
पत्रकार सदस्य व पदाधिकारी हिच संघटनेची खरी ताकद आहेत. त्यांच्या कार्यक्षमता, जाणीव, आणि संघटनात्मक कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडियातर्फे दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून अमळनेरात ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर परिसरात राज्यस्तरीय ‘व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकारी केडर कॅम्प’ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे.खासदार स्मिता वाघ प्रमूख मार्गदर्शिका असतील.
सदर शिबिरासाठी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले व अनेक प्रमूख पदाधिकाऱ्यांची उपस्थित राहणार आहेत.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही संस्था गेल्या काही वर्षांत पत्रकारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि व्यावसायिक सक्षमीकरणासाठी सातत्याने लढा देत आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या पत्रकारांपर्यंत सर्वांना एकत्र आणण्याचे, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे व शासन-प्रशासनापर्यंत प्रभावीपणे समस्यांची मांडणी करण्याचे कार्य संघटनेमार्फत सातत्याने केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून या राज्यस्तरीय केडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात पत्रकार सुरक्षेवरील विचारमंथन, संघटनात्मक प्रशिक्षण व जबाबदाऱ्या, डिजिटल मीडिया कौशल्य कार्यशाळा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा पत्रकारिता क्षेत्रावरील प्रभाव, पत्रकार-शासन संवादाचे धोरण, ठराव व कार्यआराखड्याची आखणी, अशा महत्त्वपूर्ण सत्रांचा समावेश असणार आहे.
दरम्यान यावेळी उपस्थित पत्रकारांना विधानसभाचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, प्रा. अशोक पवार , ज्येष्ठ पत्रकार डॉ. युवराज परदेशी यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.