मंगळवारी दि. २८ नोव्हेंबरला वारकऱ्यांचे स्वागत
– शिवभवन परिसरात महासोहळाआर्वी :- कार्तिक यात्रेच्या निमित्ताने कार्तिक प्रतिपदेला दहीहांडीच्या दिवशी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे दरवर्षी परिसरातून मोठ्या प्रमाणात दिंड्या येत असतात. दरवर्षी विठ्ठल मंदिराच्या बाजूला प.पू.श्री. संत अच्युत महाराज तपोभूमी शिवभवन समोरील प्रांगणात वारकरी आणि सर्वच यात्रेकरूसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यंदाही स्व. वामनराव दिवे स्मृती प्रित्यर्थ मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी महाप्रसाद व दिंडी घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कौंडण्यपुर हे चारही युगांत अस्तित्व असलेले अत्यंत पुरातन असे नगर आहे. द्वापार, सत्य, आणि कलियुगातही या गावाच्या अस्तित्वाचे दाखले आहेत. भगवान श्रीकृष्णाने याच नगरीतील अंबिका मातेच्या मंदिरातून रुख्मिणीचे हरण केल्याची आख्यायिका पुराणांत आहे. दमयंतीचे माहेरही हेच तसेच दशरथ राजाची आई राणी इंदुमती आणि प्रभु रामाची भक्त शबरीदेखील याच ठिकाणी जन्माला आल्याचे दाखले पुराणात आहेत सदाराम महाराज म्हणून महान पुण्यात्मा 400 वर्षापूर्वी याच नगरात होऊन गेले. श्री. संत अच्युत महाराजांची ही तपोभुमी आहे.
श्री संत अच्युत महाराज यांनी येथील शिवभवनाचा जिर्णोध्दार केला. शिवभवन हे अद्धभुत असे शिवाचे मंदिर आहे. या ठिकाणी शिवाच्या तीन पिंडी आहेत. जमिनीच्या खाली 30 फुट, नंतर 15 फुट आणि मग जमिनीवर अशी तिन शिवलिंग आहेत. आज तिथे शिवपंचायतनाची स्थापना करण्यात आली आहे. अच्युत महाराजांनी अनेक ग्रंथांची सिद्धता याच ठिकाणी केली. प्राचीन ऋषिमूनींनी याच ठिकाणी तपसाधना केली आहे. कार्तिकी यात्रे निमित्त विठ्ठल-रुखमाई कौंडण्यपुरात अडीच दिवसांच्या वास्तव्याला असतात अशी भाविकांची अनादी काळापासुनची श्रध्दा आहे. त्यामुळे कार्तिक यात्रेला अमरावती जिल्हाच नव्हे तर दूरवरून वारकऱ्यांच्या दिंड्या कौंडण्यपुरात येतात.
त्या पौर्णिमेच्या दिवशी कुन्हा येथे एकत्र येतात आणि तिथे रीगण केल्यावर त्या कौंडण्यपुराकडे कुच करतात. पहाटेपासुनच दिंड्यांचे आगमनाने नगरी दुमदुमून जाते. मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबरला पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत यात्रेत मुक्कामी भक्तांना स्व.वामनराव दिवे स्मृती प्रित्यर्थ चहाचे वितरण केले जाईल. सकाळी ८ ते १० या वेळात वारकरी दिंडीत सहभागी विणेकांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले जाईल आणि नंतर ११ ते दुपारी ३ या वेळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रुक्मिणीचे माहेरघर व विदर्भाची पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपूर येथे संत अच्युत महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या शिवभवन येथे कार्तिकी यात्रेनिमित्त अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठ येथील संत आचार्य जितेंद्रनाथ महाराज, हभप ऍड सचिन महाराज देव यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकरी दिंड्याचे स्वागत होईल. या यात्रेचा आनंद घेता यावा व यात्रेच्या दिवशी तीर्थस्नान करता यावे यासाठी सोमवार २७ रोजी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सुधीर दिवे मार्गदर्शक स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केली आहे.