वर्धा, दि. 25 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्यात जवळपास 200 कलावंतांचा सहभाग राहणार आहे. नाट्याचे प्रयोग यशस्वीपणे पार पडण्यासाठी विविध 15 समित्या स्थापन करण्यात आल्या आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समिती राहणार आहे. विविध समित्यांमध्ये स्टेज उभारणी समिती, विद्युत समिती, निवास व्यवस्था, स्वच्छ पाणी तसेच भोजन व्यवस्था समिती, आरोग्य समिती, सुरक्षा समिती, वाहनतळ समिती, विविध परवानेबाबत समिती, मंच व्यवस्थापन समिती, स्थानिक राजशिष्टाचार व निमंत्रण पत्रिका वाटप, कार्यक्रमाचे संचालन, स्वागत, स्वयंसेवक समिती, प्रचार प्रसिध्दी समिती, लेखा समिती व पासेस समिती अशा एकूण 15 समित्यांना कामकाज व जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.
शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष राज्यभर विविध कार्यक्रमाने साजरे केले जात आहे. महाराजांचे जीवनकार्य, त्यांचे शौर्य, साहस, पराक्रम, विजयी परंपरा नवीन पिढीला माहिती व्हावी, यासाठी राज्यभर जाणता राजाचे प्रयोग केले जात आहे. तीन दिवशीय महानाट्याचे आयोजन दि. 6 ते 8 फेब्रुवारी पर्यंत स्वावलंबी मैदान, रामनगर, वर्धा येथे करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक महापराक्रमी योद्धा, कुशल प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राजा, रयतेच्या सहकार्यातून, रयतेचे राज्य निर्माण करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमानाचा झेंडा संपूर्ण विश्वात फडकविणाऱ्या या राजाची किर्ती आजच्या पिढीला ‘जाणता राजा’ या नाट्य प्रयोगातून समजणार आहे.
सन 1985 साली पुणे येथे या महानाट्याचा पहिला प्रयोग झाला होता. अमेरिका, इंग्लंड या देशांसह देशातील 11 राज्यांमध्ये 1149 प्रयोग झाले आहेत. महाराजांच्या जन्मापासून मावळे जमवून बाल शिवाजींनी स्वराज्य स्थापनेची घेतलेली प्रतिज्ञा, अफजलखान वध आदिंसह शिवराज्याभिषेक सोहळ्याची आकर्षक आतषबाजी महानाट्यातून बघायला मिळणार आहे. शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिकांनी सहकुटुंब प्रयोग बघावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.