वर्धा – जबडा कमकुवत झाल्याने आठ वर्षांपासून अन्न चावण्यास अडचण येत असल्याने अत्यंत त्रस्त असलेल्या ५९ वर्षीय रुग्णास अखेर सावंगी मेघे येथील शरद पवार दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील उपचारांनी दिलासा मिळाला.
चंद्रपूर येथील हिशोदकुमार तुरे (५९) हे मागील आठ वर्षांपासून अन्नचर्वण करताना येणाऱ्या अडचणींमुळे त्रस्त होते. या काळात त्यांनी अनेक ठिकाणी दंतोपचार घेतले, मात्र त्यात यश आले नाही. दंतवैद्यांनी पाठ फिरवली असताना तुरे यांनी हिंमत न हारता अखेरचा इलाज म्हणून सावंगीच्या शरद पवार दंत रुग्णालयाकडे उपचारांसाठी धाव घेतली. रुग्णालयातील दंत व मुख शल्यचिकित्सकांनी तपासणी केली असता वरचा जबडा अत्यंत कमकुवत झाल्यामुळे तसेच दातांमध्ये कीड पसरल्याने उपचारांमध्ये बाधा येत असल्याचे आढळले. रुग्णाच्या जबड्याचे सीटी स्कॅन केले असता जबड्याच्या झिगोमॅटिक भागातील हाडे चांगल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. ओरल सर्जन आणि प्रॉस्टोडोन्टिस्ट यांनी रुग्णाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी झिगोमॅटिक हाडांमध्ये इम्प्लांट करण्याचा निर्णय घेतला आणि वरच्या जबड्यात दोन व खालच्या जबड्यात चार दातांची पुनर्रचना विशिष्ठ पद्धतीने करण्यात आली.
या यशस्वी शस्त्रक्रियेने रुग्णाला दिलासा मिळाला असून अन्नचर्वणाची क्षमता पूर्ववत झाल्याने तसेच दातदुखीपासून मुक्तता मिळाल्याने रुग्णाने शल्यचिकित्सकांचे आभार मानले. आठ वर्षांच्या संघर्षानंतर अवघ्या एक महिन्याच्या उपचाराने जीवन पुन्हा आनंददायी झाले असल्याची भावना तुरे यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रक्रियेत दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, दंत महाविद्यालयाच्या संचालक मनिषा मेघे, अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, मुख्य दंतवैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली बोरले, कृत्रिम दंतशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेखा गोडबोले, मुख शल्यचिकित्सक डॉ. नितीन भोला, डॉ. सीमा साठे, डॉ. भूषण मुंदडा, डॉ. आरुषी बेरी यांचे मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभले.