वर्धा – सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारे सोमवार, दि. ४ पासून ९ मार्चपर्यंत मेडिसिन, हृदयरोग व अस्थिरोग विभागात विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात मेडिसिन विभागात रक्तदाब, जुनाट ताप, किडनीचे आजार, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, हृदयरोग विभागात जुनाट हृदयविकार, छातीत दुखणे, धडधड होणे, धाप लागणे तर अस्थिरोग विभागात संधिवात, अस्थिभंग, हाडांशी संबंधित सर्व व्याधी, पायांचे वाकडेपण, मणक्यातील गॅप तसेच सांधे बदलाबाबत तज्ज्ञ डाॅक्टर तपासणी आणि उपचार करणार आहेत. या शिबिरातील रुग्णांना सर्वसामान्य चाचण्यांसह सीटी स्कॅन व एमआयआर या तपासण्यांवरही विशेष सवलत देण्यात येणार आहे. शिबीर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित असून नागरिकांनी या विशेष शिबिराचा तसेच सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे व रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी केले आहे.